छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दहाचाकी हायवा वाहन विक्रीच्या व्यवहारातील ठरल्यानुसार रक्कम न देता वाहनाचा ताबा स्वतःकडे ठेवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना एन-३ परिसरात घडली. याबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यात गणेश संतोष मराठे (वय २५, रा. भडगाव ता. भडगाव जि. जळगाव), असे फसवणूक करणार्याचे नाव आहे.
या प्रकरणात दीपक भानुदास वाघमोडे (वय ४०, रा. नाथनगर, विटखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी २०१८ मध्ये दहाचाकी हायवा (एमएच २० ईजी ६७१८) खरेदी केला. वाघमोडे यांना आर्थिक अडचण आल्यामुळे हे वाहन विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
वाहन विक्री एजंट शेख इस्त्राईल शेख तारो (रा. देवळाई) यांच्या माध्यमातून गणेश याच्याशी १७ नोव्हेंबर २०२३ ला १९ लाख रुपयांत हायवा विक्रीचा व्यवहार ठरला. याबाबत करारनामा करण्यात आला. त्यात पहिले रोख चार लाख, त्यानंतर फोन-पेद्वारे एक लाख तसेच एजंटमार्फत तीन लाख रुपये दिलेे.
आरटीओ पासिंग, रोड टॅक्स, विमा व वाहन कागदपत्रांसाठी दोन लाख, असे एकूण दहा लाख रुपये पोचले होते. उर्वरित नऊ लाख रुपये आठ महिन्यांत देण्याचे ठरले; परंतु मुदतीनंतरही गणेशने ही रक्कम दिली नाही.












